Election Results 2023 : देशात चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून (Election Results 2023) आता बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पुन्हा मोदी फॅक्टर चालला आहे. लोकांनी मोदींच्याच नावावर भाजपाच्या पारड्यात भरभरुन मतांचं दान केलं अन् सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाट करून दिली. या राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानात काँग्रेसची सत्ता होती. या दोन्ही राज्यांत भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. तर मध्यप्रदेशातही काँग्रेसला खूप मागं ढकललं आहे. दुपारी एक वाजताच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 53 जागांवर, मध्यप्रदेशात 163 तर राजस्थानात 114 जागांवर भाजप आघाडीवर आहे. काँग्रेसला मात्र जबर दणका बसला आहे. राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेत्याचा जोरदार प्रचार फेल ठरला आहे.
मागील 2018 च्या निवडणुकीत भाजपने राजस्थानात वसुंधराराजे, मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत निवडणूक लढली होती. या तिन्ही राज्यांत भाजपाचा पराभव झाला होता. आताच्या निवडणुकीत मात्र भाजपने चूक केली नाही. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाने जनतेला मतं मागितली. त्याचा परिणामही दिसून आला. या तिन्ही राज्यात सध्या भाजप आघाडीवर असून बहुमत मिळवताना दिसत आहे. या राज्यांत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड