हदगाव प्रतिनिधी शुभम तुपकरी /- तालुक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दिवाळी पुर्वी शासन अनुदान जमा करणार असल्याची घोषणा होऊन देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा झाले नाही. हे अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ वानखेडे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
हदगाव शहरासह तालुक्यात सतत ३ वेळा अतिवृष्टी होऊन येथील शेतकऱ्यांच्या पिके होत्याचे नव्हते झाली होती जुलैमध्ये खरीप हंगामात तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची पिके खरडून गेली . त्या नुकसानीचे येथील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व तलाठ्यांनी ह्यांचे पंचनामे करून शासना कडे ह्याचे अहवाल सुद्धा पाठवले आहेत शासनाकडून जाहीर केलेली मदत आजपर्यंत आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा. दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदानासह पीक विमा देखील सरकार देणार आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार होते, परंतु दिवाळी संपली तरी अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. जाहीर करण्यात आलेले पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. विद्यमान जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी हदगाव तालुक्यातील अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष शिवाभाऊ वानखेडे यांनी प्रशासनाकडे केली आहे….