मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या तुलनेत अनुयायी येत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. महापरिनिर्वाण दिनी सर्वांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईत येत्या ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुट्टी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यातच ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड