छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी! विजय पाटील !
दि : १२/०१/२०२४
शासनाच्या वाळू उत्खनन धोरणानुसार फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यातील एकूण ११ वाळू घाटांमधून ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध होणार असून नागरिकांना आता वाळू खरेदी करता येणार असून त्यासाठी सेतू केंद्रात नोंदणी करणे आवश्यक असेल असे जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. १९/०४/२०२३ रोजीच्या सर्वंकष वाळू धोरणानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमतीस अधिन राहून वाळूगटातून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या बांधकाम योग्य वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्री करणेकरीता १३ वाळू घाटासाठी ०६ वाळू डेपो साठी ई-निविदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यातील एकुण ११ वाळू घाटासाठी ४ वाळू डेपोसाठी निविदा प्राप्त झाल्या असुन ११ वाळू घाटामधून नागरिकांना ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.
लिलावात गेलेल्या वाळू घाट व डेपोचा तपशील पुढील प्रमाणे- फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गेवराई (गुंगी) येथे ६०१३ ब्रास, पैठण तालुक्यात नांदर भाग १, भाग २, भाग ३, नवगाव भाग २ आणि ब्रह्मगाव येथील ब्रह्मगाव डेपोत सर्व घाट मिळून २३ हजार ५९२ ब्रास, सिल्लोड तालुक्यात धानोरा वाळू घाटाच्या मोढा खु. डेपोवर ५०८८ ब्रास, वैजापूर तालुक्यात पुरणगाव, भालगाव, अव्वलगाव, नागमठाण घाटावरील डागपिंपळगाव डेपोवर ३०६३४ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे. अशी एकूण ६५३२७ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी दिली आहे.
ग्राहकास सेतु सुविधा केंद्रात नोंदणी करणे आवश्यक- वाळु खरेदीसाठी ग्राहकास सेतु सुविधा केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. घरकुल लाभार्थी व सर्वांना वाळूची नोंदणी करतांना सेतूची नोंदणी फी २५ रुपये भरावी लागेल. नोंदणी करतांना रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्र इ. कागदपत्रे/ पुरावा सोबत आणावे. नोंदणी करताना मोबाईल क्रमांक अनिवार्य असून, OTP साठी मोबाईल आवश्यक आहे. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल. इतरांसाठी ६०० रुपये अधिक १० टक्के डीएमएफ ६० रुपये अधिक एसआय चार्ज १६ रुपये एकूण ६७७ रुपये . तसेच ५२ रुपये प्रतिब्रास किमतीने एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. त्यानंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर वाळूची मागणी ग्राहकास करता येईल. नोंदणी झाल्यानंतर बुकींग ID असलेली पावती प्राप्त करुन सदर पावती वाळू डेपोवरील डेपोमॅनेजरला दाखवून वाहतुक पावती प्राप्त (ETP) करुन घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. शासनाच्या अधिकृत वाळू डेपो वरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी महाखनिज वेबसाइटवर ट्रान्सपोर्टर म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. अशा वाहनांना (AIS-140 IRNSS) GPS यंत्रणा असणे आवश्यक आहे. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून वाळू नेणे बंधनकारक आहे.
सत्यप्रभा न्यूज