हिमायतनगर काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे गृहमंत्र्यांना निवेदन
हिमायतनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबुतर चोरीच्या संशयावरून अनुसूचित जातीच्या लहान मुलांना केलेल्या अमानुष्य अमानवी व क्रूर मारहाण प्रकरणाची उच्चत्तरीय चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाच्या वतीने तहसील कार्यालय यांचेमार्फत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
गावात कबूतर चोरल्याच्या संशयावरून हरेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर येथे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील लहान मुलांना झाडाला लटकून मारहाण करण्यात आल्याची माहिती माध्यमाद्वारे मिळत आहे. एकाच्या अंगावर तर चक्क लघवी करून व त्यांना थुंकी चाटायला लावले असे पिडीतांच्या कुटुंबाकडून सांगितले जात आहे. तसेच त्यांना कपडे काढून झाडाला लटकवून जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण करत असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर फिरत आहे. वरून बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपींनी पिडितांना दिली असल्याची माहिती आहे. हे प्रकरण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेत येते त्याच पद्धतीने हे प्रकरण हाताळण्याचे निदर्शक संबंधित पोलीस प्रशासनाला देण्यात यावे.असेही निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार ही बाब अतिशय गंभीर असून महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला कलंक लावणारी ही घटना आहे. तसेच बिहार उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात जंगल राज आले आहे की काय अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कायदा व सुव्यवस्थेची अक्षरशः वाट लागली आहे. असे यासारख्या घटनावरून सिद्ध होते गुन्हेगारावर कायद्याची वचक नसणे म्हणजे हे राज्याच्या गृह खात्याचे अपयश आहे.असा आरोप श्री.संतोष आंबेकर तालुकाध्यक्ष,हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांनी निवेदनातुन केला आहे.
या प्रकारात आपण गांभीर्याने लक्ष घालून पिडीताना तात्काळ संरक्षण द्यावे व पिडीताना तात्काळ न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी हिमायतनगर काँग्रेसचे कार्यकर्ते विकास गाडेकर करंजीकर,कपिल कांबळे, नामदेव मोकसवाड,मारोती गाडेकर,माधव गाडेकर,बाबुराव भालेराव,शेख हसन,मारोती वाघमारे यांच्यासह सामाजिक चवळीतील असंख्य तरुण उपस्थित होते. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड