नियोजनबद्ध विकासात्मक कार्यामुळे नांदेड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली मा.राज्यपाल श्री. रमेश बैस
नांदेड दि २५: अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या सोबतच नवीन युगातील नवीन आव्हानांना समर्थनपणे सामोरे जाणारे अभ्यासक्रम तयार करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंमध्ये मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी केले.
ते आज दि २५ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी अभासी पद्धतीने बोलत होते. यावेळी दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विशेष अतिथी श्री. बी. सरवनण, अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. एम. के. पाटील, डॉ. विकास सुकाळे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, नारायण चौधरी, डॉ. संतराम मुंढे, डॉ. माधुरी देशपांडे, हनमंत कंधारकर, सहसंचालक रामकृष्ण धायगुडे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व १०३ विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुढे राज्यपाल महोदयांनी विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची मनसोक्त प्रशंसा केली. यामध्ये कोव्हीड-१९ काळातील कोव्हीड लॅब, हरित विद्यापीठ परियोजना, जलपूर्णभरण प्रकल्प आदी विषयाचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती, सांस्कृतिक कला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची यावेळी मा. राज्यपाल महोदयांनी प्रशंसा केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारत सरकारच्या अनुखनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय अणुउर्जा विभागाचे उत्कृष्ट शास्त्रज्ञ तथा संचालक श्री. बी. सरवणन यांनी आपल्या मनोगतात ते उपस्थित विद्यार्थ्यांना म्हणाले, आज तुमची मेहनत, निश्चय आणि चिकाटी याचे फळ तुम्हाला मिळाले आहे. तुम्ही तुमची पदवी प्राप्त केली आहे. उद्यापासून तुमचे एक नवे आयुष्य आणि नवे भविष्य याचा प्रारंभ होणार आहे. असे भविष्य ज्यामध्ये जास्त अनिश्चितता असेल, निश्चित असेल ते म्हणजे केवळ हे की, तुम्ही खूप अडचणी आणि खूप अडथळे यांना सामोरे जाल. मी तुम्हाला या नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यांचा सामर्थ्य आणि धैर्याने सामना करण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे लक्षात ठेवा की तुम्ही इथे प्राप्त केलेली कौशल्य आणि ज्ञान ही तुमची खरी संपत्ती आहे. जी तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्वच क्षेत्रामध्ये पुरेशी ठरणार आहे. तुम्ही केवळ तुमच्या व्यवसायासाठीच मूल्यवान नाही आहात तर आपल्या राष्ट्राची बौद्धिक संपदा आहात. तुमची क्षमता ओळखा तुम्ही आयुष्यात काय करू शकता याची संभाव्यता ओळखा. कारण तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे या गोष्टीवर अवलंबून आहे. या देशाला आणि तुमच्या पालकांना तुमचा अभिमान वाटावा, स्वतःला स्वतःबद्दल अभिमान वाटेल असे कार्य करा.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या उपलब्धी व वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा आढावा घेत असे प्रतिपादन केले की, भारत देशाची ओळख ही तरुणांचा देश म्हणून तर आहेच, शिवाय उत्तम वैज्ञानिक, कार्यकुशल संशोधक, विविध क्षेत्रात देदीप्यमान कार्यातून जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या यशस्वी व्यक्तींचा देश म्हणून भारताने विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चंद्रयान-३ हे आहे. ज्ञान- विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही भारताने विशेष आघाडी घेतली आहे. भविष्यात आपला देश जागतिक पातळीवर अधिक आणि सर्वार्थाने सक्षम होण्यासाठी विद्यार्थी व तरुणांचे योगदान महत्त्वाचे राहील.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातले एक तरुण विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे बहुतांश आदिवासी व ग्रामीण भागातील आहेत. भाषा, संस्कृती आणि राहणीमान मोठ्या शहरातील संस्कृतीपेक्षा वेगळी असली तरी आमचे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आणि कल्पक आहेत. पुढे ते प्रमुख अतिथी यांना उद्देशून म्हणाले, या विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक योग्य दिशा निश्चितच करता यावी यासाठी आपल्यासारख्या यशस्वी व विद्वान व्यक्तीच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा देणाऱ्या आपल्या कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ऐनवेळी उपस्थित झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे ते अभासी पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधू शकले नाहीत.
प्रमुख अतिथींचे दीक्षान्त मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रारंभी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. पृथ्वीराज तौर व डॉ. योगिनी सातारकर यांनी केले.
यावेळी मा. अधिसभा सदस्य, मा. विद्यापरिषद सदस्य यांच्यासह संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. #हत्यप्रभा न्यूज #नांदेड