नांदेड दि.३०: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे राज्यपाल मा. श्री. रमेश बैस हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना. चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत हा दीक्षान्त समारंभ संपन्न होणार आहे.
या दीक्षान्त समारंभामध्ये सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी व पी.एचडी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी दि. २३ सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील समन्वय कक्षामध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. पी.एचडी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी समारंभाच्या दिवशी सकाळी ८ ते १० वा. दरम्यान त्यांच्या उपस्थितीची नोंद पदव्युतर विभागामध्ये करणे आवश्यक आहे.
या दीक्षान्त समारंभामध्ये सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच पी.एचडी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात ठीक २:०० वा. दीक्षान्त मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
या विद्यापीठातील सर्व संकुलातील विद्यार्थ्यांनी, उपपरिसर लातूर येथील संकुलातील विद्यार्थ्यांनी व न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील ज्या विद्यार्थ्यांनी २६ व्या दीक्षान्त समारंभासाठी उपस्थित राहून पदवी किंवा पदविका घेण्यासाठी अर्ज सादर केलेले आहेत. अशाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातील दीक्षान्त कक्ष विभागातून सकाळी ८ ते १० दरम्यान पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
दीक्षान्त समारंभामध्ये उपस्थित राहून पदवी किंवा पदविका ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धवल पायजमा किंवा पॅन्ट व धवल कॉलरसहित असलेला शर्ट असा परिधान करावा. विद्यार्थिनींनी धवल साडी व धवल ब्लाउज किंवा धवल रंगाच्या ओढणीसह धवल पंजाबी ड्रेस परिधान केलेला असावा.
या विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या २६ जून २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार आपापल्या महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेली आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र दि. २५ सप्टेंबर रोजीच्या २६ वा दीक्षान्त समारंभ संपन्न झाल्यानंतर एक महिन्याच्या आत आपल्या महाविद्यालय स्तरावरून पदवी वितरण कार्यक्रम आयोजित करून पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनीकेले आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड