किनवट : कोणतीही सुटी न घेता आदिवासी , दुर्गम , डोंगरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सदैव झटणारे शिक्षक सुरेंद्र गंगाधर कुडे यांची राज्य शासनाच्या यावर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांचेकडून त्यांचा गौरव करण्यात आला.
किनवट विधानसभा मतदार संघातील माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी (पालाईगुडा) येथे कर्तव्यावर असलेले सुरेंद्र गंगाधर कुडे ह प्राथमिक शिक्षक म्हणून चाकोरीच्या बाहेर जाऊन समाजासाठी समर्पकपणे काम करतात. हे आशादायी चित्र आहे. रविवारची सुटी असो किंवा सण व उत्सव असो त्या सुटीचा उपभोग न घेता ते सकाळी 8 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देतात. या त्यांच्या प्रभावी नवोपक्रमामुळेच तब्बल 28 विद्यार्थ्यांना त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिलाय, 200 पेक्षाही जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेत व 80 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेत.
आदिवासी, डोंगरी व अतिदुर्गम भागात उत्कृष्ट कार्य केल्याच्या गौरवार्थ त्यांची राज्य शासनाच्या यावर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांचे वतीने त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांचे मार्फत तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, शहर प्रमुख सुरज सातूरवार, माजी उपसभापती गजानन कोल्हे, उत्तम कानिंदे , समीर जायभाये व मारोती गुडेटवार यांनी शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला. प्रा. सुरेश कटकमवार यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.
” हक्काची सुटी त्यागून अतिदूर्गम , डोंगरी भागातील आदिवासी, भटक्या उपेक्षित समाजातील लेकरांच्या चेहर्यावरील आनंद फुलवून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सतत नवोपक्रम राबविणारे सुरेंद्र कुडे गुरुजी यांचं कार्य हे ऋषितुल्य आहे. आधुनिक काळात ते एक दिशादर्शक आहेत. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. त्यांच्या भावी कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा !
-हेमंत पाटील, खासदार, हिंगोली लोकसभा
“
” शाळा कुटूंब व विद्यार्थी हेच दैवत मानून त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी समयदान, ज्ञानदान देऊन सदैव धडपडणारे सुरेंद्र कुडे सर यांचं दैदिप्यमान कार्य सध्याच्या युगात प्रेरणादायी आहे. त्यांच्या निस्सीम सेवाकार्यास वंदन !
-राजश्री हेमंत पाटील , अध्यक्षा , गोदावरी परिवार. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड