राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. मात्र, या भेटीमागील कारण समोर आले आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देण्यात आले. या आमंत्रणासाठी पवार स्वत: वर्षा बंगल्यावर दाखल झाले.
शरद पवार यांनी आज घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले. शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमासाठीचे आमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीवरून अनेक चर्चा सुरू झाल्या. या चर्चा सुरू होण्यामागे मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने ही चर्चा सुरू झाली आहे. आज गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर न जाताच फक्त हजेरी लावून माघारी फिरले. त्यामुळे पवार यांच्या भेटीबाबतच्या चर्चांना उधाण आले.