हिमायतनगरः मंगरुळ येथुन हिमायतनगर येथे शिकायला असलेल्या विद्यार्थीनींना तब्बल 4 किलोमीटर भर पावसात पायपीट करत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे त्या प्रचंड हैरान होत आहेत व वेळेवर पोहचत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान सुद्धा होत आहे. गावाचं उद्याचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल व शैक्षणिक नुकसान काँग्रेस पक्ष कदापी खपवुन घेऊ शकत नाही. त्यामुळे हदगाव आगार व्यवस्थापनाने लवकरात लवकर मंगरुळ ला बस सोडावी अन्यथा आगार व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे तालुकाअध्यक्ष तथा मंगरुळचे उपसरपंच श्री.संतोष आंबेकर यांनी आगार व्यवस्थापक श्री. धर्माधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
हदगाव आगाराची बस हिमायतनगर मार्गे वारंगटाकळी पर्यंत दररोज दोन वेळा येते.परंतु खैरगाव – मंगरुळ पुलाचे बांधकाम चालु आहे त्यामुळे त्यामार्गाने मंगरुळला येणारी बस सद्या बंद करण्यात आली आहे. तरी वारंगटाकळी पासुन अवघ्या 2 किलोमीटर वर असलेल्या मौजे मंगरुळ ला बस पाठवायला प्रशासनाला काय अडचण आहे ? असा प्रश्न येथील ग्रामस्थ करत आहेत.
तालुकाअध्यक्ष व उपसरपंच श्री.संतोष आंबेकर यांच्या नेतृत्वात मंगरुळ येथील शिष्टमंडळाने थेट हदगाव आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन मंगरुळला बस सोडण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. या शिष्टमंडाळात दिगांबर सोमनवाड,रामकिशन गुर्लेवाड,मारोती आक्केमवाड,बालाजी खंदारे,परमेश्वर स्वामी,प्रभाकर खंदारे, गजानन दासरवाड,दिगांबर दासरवाड, राम कुंजरवाड, विकास गाडगेराव,रमेश सरपे आदींचा समावेश आहे. # सत्यप्रभा न्यूज #नांदेड