देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्ली हत्याकांडाची घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्येही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूल होत नसल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील रहिवासी संकुलात रोहित राज आणि नीतू कुमारी हे दाम्पत्य राहत होतं. मूळच्या बिहारमधील असलेल्या या जोडप्याचे २०११साली लग्न झालं होतं. मात्र, १२ वर्षांच्या संसारानंतरही या दाम्पत्याला मूल होत नव्हतं. यासाठी वैद्यकीय उपचार देखील सुरू होते. मात्र उपचारांना गुण येत नव्हता. रोहित आणि नीतू यांना मुलं होत नव्हते म्हणून दोघंही नैराश्यात गेले होते. नीतूची आयव्हीएफ ट्रीटमेंटही सुरू होती.
रोहित राज हा नीतूच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसंच, दोघा पती-पत्नींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुल होत नसल्याने पती सतत वाद होत होते. रविवारी दुपारच्या सुमारास हे वाद विकोपाला गेले. त्यात रागाच्या भरात पती रोहितने नितु कुमारी हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. रोहितने केलेला वार वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. नीतूची हत्या केल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास रोहितने शेजाऱ्यांना आरडा-ओरडा करत बोलवून घेतलं व आपल्या पत्नीची कोणीतरी हत्या केल्याचं सांगितले. शेजाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रोहितच्या बोलण्यावरुन पोलिसांना संशय येताच त्यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तो देत असलेले उत्तरे पाहता पोलिसांचा संशय दाट झाला. नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. याप्रकारणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी पती रोहित राजला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान नीतू कुमारीच्या हत्येनंतर ती राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. एप्रिल महिन्यात राज्यात एकूण ३, ७२६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यात एकूण ८ हजार ३१६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, मागील वर्षात एकूण १८, ०९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.