नांदेड दि.२३ : मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरुन मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांला जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली, या त्रासाला कंटाळून मुलाच्या वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप मुलाच्या आईने केला आहे. या प्रकरणी माहूर पोलिसांनी ११ जणांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिगंबर कट्टेवार (वय ५८ ) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने लांजी गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत दिगांबर कट्टेवार हे आदिवासी समाजाचे असून माहूर तालुक्यातील लांजी येथील रहिवासी आहे. मयत दिगंबर कट्टेवार यांचा २४ वर्षीय मुलगा अंकुश कट्टेवार याने गावातील एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेले असा संशय मुलीच्या नातेवाईकांना होता. त्यानुसार १३ जून रोजी मुलीच्या वडिलांनी अंकुश विरोधात माहूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा गुन्हा दाखल केला. या नंतर मुलीचे नातेवाईक मुलाच्या घरी गेले. तुझ्या मुलाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे, तुझ्या मुलाला आमच्या आमच्या ताब्यात दे अन्यथा तुझे घर तुझ्या घरच्या माणसांसहित जाळून टाकतो. गावात धिंड काढून हकालपट्टी करतो ,अशी धमकी देत आरोपींनी दिगांबर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. सलग दोन तीन दिवस आरोपींनी मारहाणदेखील केली,असा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे.दरम्यान,मुलीच्या नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळलेल्या दिगंबर कट्टेवार यांनी २० जून रोजी शेतात जाऊन विष प्राशन केले. उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवार २१ जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरोपींच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली असा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे. आत्महत्येप्रकरणी माहूर पोलिसांनी मयताची पत्नी सुमित्राबाई कट्टेवार यांच्या तक्रारी वरुन मधुसिंग गुलाबसिंग जाधव, रवि पवार, लक्ष्मण थावरा राठोड, गणेश अंबादास राठोड, लच्छु थावरा राठोड, लखण लच्छु राठोड, विजय लच्छु राठोड, बबलु लच्छु राठोड, विक्रम दिलीप चव्हाण,राहुल प्रकाश जाधव यांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिनगांरे हे करीत आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड