जालना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉझिटिव्ह निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिल्याचं मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील #Manoj_Jarange_Patil यांनी म्हटलं आहे. तसंच तह करण्याची ताकद नाही, मराठ्यांच्या पोरांच्या पदरात जीआरचे दान टाका, असं जरांगे यांनी अर्जुन खोतकर यांच्यासमोर हात जोडून म्हटलं. शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन जालन्यातील आंदोलनस्थळी पोहोचले. अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी केली. शिवाय यावेळी खोतकर यांनी मनोज जरांगे यांना फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या #MarathaReservation मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यानंतर अर्जुन खोतकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन जालन्यातील आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु मी पाणी पितो पण आधी जीआर घेऊन या, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावेळी अर्जुन खोतकर यांच्यासह रासपचे नेते महादेव जानकर, पंजाबराव डख हे देखील आंदोलनस्थळी हजर होते.
मुख्यमंत्र्यांना जरांगेच्या प्रकृतीविषयी काळजी : मनोज जरांगे पाटील
“मनोज जरांगे यांना मसुदा दाखवला आहे. त्यांनी काही बदल सुचवले आहेत. जरांगे पाटील यांचा लढा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यांच्या लढ्याला निश्चितच यश मिळेल. निर्णय झाला तर उद्याच जीआर जारी होईल. मी आणि जानकर आजच मुंबईला जात आहे. उद्या सकाळी जीआर घेऊन जरांगेकडे येईल,” असं अर्जुन खोतकर यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांना जरांगेच्या प्रकृतीविषयी काळजी आहे. शिंदे हे सतत मला जरांगेबद्दल विचारत आहेत, असंह खोतकर यांनी सांगितलं.
आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून 1 सप्टेंबर रोजी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. या घटनेत आंदोलकांसह पोलीस देखील जखमी झाले आहेत.