मुंबई | काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तिन्ही घटक पक्षांनी जागावाटपाच्या चर्चेसाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र, काँग्रेसने (Congress) जाहीर केलेल्या या समन्वय समितीमधील नावामुळे पक्षातंर्गत वादाच फटाके फुटू लागले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी रणनीती निश्चित करतेय, पण रणनीती निश्चित करतानाच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत कुणाची वर्णी लावायची यावरुन काँग्रेस अंतर्गत वाद दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचे सदस्य म्हणून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेंकडून (Nana Patole) तीन नावे जाहीर करण्यात आली. मात्र, परस्पर नावे ठरवल्यानं केंद्रातील वरिष्ठांची मात्र नानांवर खप्पामर्जी झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे समन्वय समितीसाठी आधी जाहीर झालेली नावे बदलली जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार या समन्वय समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र ही नावे निश्चित करताना महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कोणतीही कल्पना न दिल्याने अवघ्या 48 तासांतच ती रद्द करण्याचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. मुख्य म्हणजे, ही यादी रद्द करताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना यासंदर्भात जाबही विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे चेहरेही समन्वय समितीत त्यांच्या नावांचा विचार न झाल्याने नाराज आहेत.
लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसने तीन जणांची नावे निश्चित केली होती. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान आणि आमदार बसवराज पाटील यांची निवड केली होती. मात्र, या यादीत विरेधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचा विचार का करण्यात आला नाही यामुळे काँग्रेसच्या एका गटात नाराजी आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा केली. या बैठकीत काँग्रेसच्या सदस्यांची नावे सोपविली होती. त्यानंतर ही यादी दिल्लीतही पाठविण्यात आली होती. मात्र, मातोश्रीवर काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी फोन करुन ही यादी अंतिम नसल्याचं कळवलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.