शासन नियमाप्रमाणे मजूरी दिली जात नाही, अनेकांना काम करून देखील वेतनच दिले नाही – मजुरावर आली उपासमारीची वेळ
नांदेड : एप्रिल २०२० पासूनचे किनवट – माहूर वनपरिक्षेत्रातील वनमजूरांचे थकीत वेतन मिळावे यासह इतर विविध मागण्या घेऊन ५ जून पासून उपवन संरक्षक वनविभाग नांदेड यांच्या कार्यालया समोर तब्बल 57 दिवसापासून बारमाई वनमजूरांचे मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे या वन मजुरावर अक्षरशा उपासमारीची वेळ आली आहे.
57 दिवसापासून पावसा पाण्यात जीव धोक्यात घालून उपासी तापाशी राहून प्रशासनाकडे ते न्यायाची मागणी करीत आहेत. मात्र गेंड्याच्या कातडीच असेल प्रशासन या कामगारांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. इतकच काय येथील मजूरांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयातील शौचालय देखील या आंदोलन कर्त्यांना वापरू दिले जात नसल्याचा आरोप मजुरांनी केले आहे. त्यामुळे महिला मजूर व पुुरूषाचे मोठे हाल होत आहेत.अति दुर्गम भाग असलेला किनवट माहूर मधील गोरगरीब मजुरांचे शोषण सुरू आहे. शेकडो मजूर अनेक वर्षापासून वनपरिक्षेत्रात वन मजुर म्हणून काम करीत असतात. मात्र या वन कामगरांना काम करून देखील शासन नियाप्रमाणे कधीच मजुरी मिळत नाही.
किनवट मधील २८ कामगारांना २०२० मध्ये ७ महिन्याची मजुरी दिली नाही, तर २२ ऑगस्ट २०२२ ते आजपर्यंतची देखील मजूरी देण्यात आली नाही. २०२१ मध्ये कोणाला ४ हजार तर कोणाला ५ हजार रूपये महिना असे काही महिन्याची मजूरी देण्यात आले तरी उर्वरित महिन्याची मजुरी दिलीच नाही. माहूर परिक्षेत्रातील ३२ कामगारापैकी ३ कामगारांना काही दिवस कामावर घेतले आणि परत त्यांनाही कामावरून काढण्यात आले. अशा प्रकारे बेकायदेशीर कामावरून काढून सेवत खंड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयीन आदेशाप्रमाणे सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे आणि मागील थकीत वेतन शासन नियमाप्रमाणे द्यावे, सन २०२३ मधील कामगारांची सेवा जेष्ठता यादी जाहिर करावी, कामगारांना भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ देण्यात यावे, या मागण्या घेऊन तब्बल ५७ दिवसापासून वन मजुरांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनात भोजू जाधव , दयानंद कांबळे , संजय जाधव , मालाबाई तलांडे , शंकुतलाबाई मगरे , अनुसया मेसराम , शाळूबाई काळे , वसंत कुंभारे , दत्ता राठोड , सखराम जाधव , दत्ता पवार यांच्यासह किनवट माहूर वनपरिक्षेत्रातील महिला पुरूष मजुर मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात बसले आहेत.