लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निगोहा रेल्वे स्थानकात मोठा अपघात टळला. शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास लूप लाईनवरुन निलांचल एक्स्प्रेस गेली. त्यानंतर लगेचच ट्रेनचा रुळ अतिउष्णतेमुळे वितळला. त्यामुळे रुळाचा आकार बदलला. निगोहा रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसला मेन लाईनच्या जागी लूप लाईनवर पाठवण्यात आलं होतं. रेल्वे रुळाचा आकार बदलल्यानं लोको पायलटला एक झटका जाणवला. त्यामुळे त्यानं ट्रेन थांबवली. याची माहिती त्यानं कंट्रोल रुमला दिली. यानंतर अभियंत्याच्या टीमनं रुळाची दुरुस्ती केली. योग्य देखभाल न झाल्यानं हा प्रकार घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी लखनऊचे डीआरएम सुरेश सापरा यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.लखनऊहून प्रयागराज-प्रतापगढ मार्गावर निगोहा रेल्वे स्थानकात मेन लाईनवर दुसरी ट्रेन उभी होती. त्यामुळे निलांचल एक्स्प्रेस लूप लाईनवरुन गेली. यावेळी लोको पायलटनं ट्रेनचा वेग कमी केला. त्यानंतर पुढे गेल्यावर ट्रेन थांबवली. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे एक्स्प्रेसचा अपघात टळला. अन्यथा बालासोरसारखी दुर्घटना घडली असती.
लखनऊ जंक्शनला पोहोचल्यानंतर लोको पायलटनं तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर रेल्वेचे बडे अधिकारी आणि कर्मचारी ट्रॅकवर पोहोचले. त्यांनी रुळांची पाहणी केली. यानंतर रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं.लूप लाईनवरुन कोणतीही ट्रेन जाऊ नये म्हणून स्टेशन मास्तरांना अलर्ट करण्यात आलं आहे. रेल्वे रुळ सरळ करण्यात आला आहे. रेल्वे रुळ अशा प्रकारे कसा वाकला यामागचं कारण अद्याप समजलेलं नाही. यासाठी डीआरएम यांनी समिती स्थापन केली आहे. ही समिती तपास करुन त्याबद्दलचा अहवाल डीआरएमना देईल. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड