छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
२६/०९/२०२३
संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या २०० कोटींचा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात मोठी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी यांनी आदर्श नागरी पतसंस्थेच्या कर्जदारांच्या मालमत्तेच्या ताब्याचे आदेश जारी केले आहे. १९ कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले असून ही मालमत्ता विकून सुमारे २०७ लाख रुपये लिलावाद्वारे मिळतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रशासक समितीच्या अध्यक्षांनी दिलेली माहिती अशी की, आदर्श नागरी सहकारी पतसंस्था म. छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक समिती नेमण्यात आलेले आहे. पतसंस्थेच्या थकबाकीदार कर्जदारांकडून कर्ज वसुली करण्यासाठी संस्थेतर्फे कर्जदारांनी तारण ठेवलेल्या मालमत्तांची सहकार कायद्यानुसार जप्ती करून त्या मालमत्तांचा ताबा मिळवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 19 कर्जदारांच्या मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी आदेश जारी केले आहेत. त्यातून पतसंस्थेची कर्ज रक्कम रुपये 207.92 लाख लिलावाव्दारे वसुल होईल.
संपूर्ण राज्यात गाजत असलेले आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण आता वेगळ्या वळणावरू येऊन ठेपले आहे. नियमांचे कुठलेही पालन न करता कर्जदारांना कर्जाची खैरात वाटप करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला असून यातील बहुतांश कर्जदारांनी ज्या उद्देशासाठी कर्ज घेतले आहे तो उद्देश साध्य न करता रक्कम उचलली. अनेकांनी कर्जच्या रकमेची परतफेडही केली नाही. यासर्वाला अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून कर्जदारांची यादीही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत सन 2016 ते 2019 या कालावधीचा चाचणी लेखापरीक्षण अहवालात १०० कोटींपेक्षाही जास्त गैरव्यवहार झाला असल्याचे नमूद केल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यप्रभा न्यूज