नांदेड : राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नांदेड जिल्हातील अनेक तालुक्याला मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही झोडपले आहे. बिलोली, देगलूर आणि मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे . मागील २४ तासात ६४.८० मिली मीटर पावसाची नोंद झाली असून ३६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गुरुवारी दुपारपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शहरातील रस्ते जलमय झाले होते. शहरात रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच विष्णुपुरी प्रकलपाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. गोदावरी नदीच्या पाणी पातळी वाढत होत असल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दूसरीकडे बिलोली तालुक्यातील हारणाळी, माचणूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासाराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव या गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने तात्काळ दखल घेत येथील जवळपास एक हजार ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
देगलूर तालुक्यातील नांदेड-हैदराबाद महामार्गावर मण्याड नदीचे पाणी पूर्ण आल्याने महामार्गा वरील वाहतूक बंद पडली आहे. वन्नाळी-वझरगा-टाकळी या मार्गाची वाहतूक पाण्यामुळे बंद आहे. अनेक प्रवासी अडकल्याची माहिती आहे. देगलूर तालुक्यातील वन्नाळी, वझरगा, तुपसेलगाव, लखा या संपूर्ण जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. मुखेड तालुक्यात ही पूर परिस्थिती कायम आहे. तालुक्यातील तारदडवाडी येथील तलाव फूटल्याने अनेक गावात पाणी शिरले आहे. अंबुलगा येथे अतिवृष्टी झाल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हदगाव तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे हदगाव तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे हदगाव शहरासह आसपासच्या गावाचा संपर्क तुटला आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड