मुंबई: भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नांदेड येथील भाजपच्या महामेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांना लक्ष्य करताना भाजपला डिवचले. तत्पूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विटही केले होते. त्यामध्ये राऊत यांनी अमित शाह यांच्या भाषणाची एकप्रकारे खिल्ली उडवली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपाचे महा संपर्क अभियान होते की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन.. अमित भाई यांच्या भाषणातील २० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम.शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले.तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे.पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात, ते पाहावे लागले.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनीच विश्वासघात केला. सत्तेसाठी ते काँग्रेसच्या मांडीवर बसले. तिहेरी तलाक, राम मंदिर, मुस्लिम आरक्षण याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली नीती स्पष्ट करावी. धर्माच्या नावाखाली आरक्षणाला आमचा विरोध कायम आहे. शिवसैनिकांची पक्षात दमछाक होत होती, म्हणून ते बाहेर पडले. आज राज्यातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे काम उत्तम सुरू आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षालाही लक्ष्य केले. गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या. गरिबांच्या घरात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, गॅस, धान्य, हाताला काम देण्याचे काम आम्ही केले. या उलट काँग्रेसने साधे शौचालयही दिले नाही. शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये अनुदान सुरू केले, राममंदिर उभारले, नवीन आयआयटी, एम्स, ७०० वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे उभारली. ५४ नवीन विमानतळ सुरू करताना २० शहरांत मेट्रो सुरू केल्या. याशिवाय वंदे मातरम् रेल्वे धावत आहेत. नांदेड-मुंबई वंदे मातरम् रेल्वे सुरू करण्याबाबत आपण रेल्वेमंत्र्याशी बोलू. केवळ देशातच नाही, तर संपूर्ण विश्वात मोंदीच्या कार्याची प्रशंसा होते आहे. दुसरीकडे भारतात कुणी ऐकत नाही म्हणून राहुल गांधी विदेशात जाऊन भाषण करीत आहेत. पाकिस्तानला घरात घुसून धडा शिकवण्याचे धाडस मोदी सरकारनेच केले, असे अमित शहा यांनी म्हटले होते. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड