सातारा: एक लाख रुपयाची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असं या लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत.अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात सहकार्य करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
अटक करण्यात आलेले दोन्ही अधिकारी औंध पोलिस ठाण्यातील आहेत. अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या खटल्यात मदत करण्यासाठी या दोघांनी दीड लाखाची लाच मागितली होती. तडजोडीअंतर्गत एक लाखाची लाच देण्याचं ठरलं. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करुन याची तक्रार केली आणि लाचलुचपत विभागाने या दोघांनाही रंगेहात पकडलं.
यातील तक्रारदाराच्या परमिट रुममधून दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराला यापुढे त्याच्या व्यवसायात इथून पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी या पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाची लाच मागितली. त्यानंतर एक लाखावर तडजोड करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस उपअधीक्षक उज्वल अरुण वैद्य यांच्या टीमने दोन्ही आरोपींना रंगेहात पकडलं. या दोन्ही पोलिसांवर औंध पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड